“सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला रत्नागिरीतून शिवसेनेचा पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन
लडाखच्या घटनात्मक संरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलनाला समर्थन; संवादातून प्रश्न सोडवण्याची केंद्र सरकारकडे मागणी

रत्नागिरी – लडाखच्या घटनात्मक संरक्षणासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रत्नागिरीतून जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन रत्नागिरी तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला सादर करण्यात आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार हे निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. लोकशाहीमध्ये मतभेदांवर तोडगा संवादातूनच निघाला पाहिजे, दडपशाहीतून नव्हे, अशी भूमिका यावेळी शिवसेनेने मांडली. तसेच आंदोलनकर्त्यांशी तातडीने सकारात्मक चर्चा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
निवेदनात जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे तातडीने पाठवावे, अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
यावेळी रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, नगरसेवक केतन शेट्ये यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



