कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

वाडेकरवाडीतील शेकडो ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

 रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; प्रलंबित विकासकामे मार्गी लागल्याचा ग्रामस्थांचा दावा

रत्नागिरी – रत्नागिरी- नाचणे येथील वाडेकरवाडीतील शेकडो ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वाडीतील विविध विकासकामे प्रलंबित होती. यातील स्मशानभूमी, पाखाडी तसेच वीजेच्या धोकादायक खांबाचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पक्षप्रवेश केल्याचे सांगण्यात आले.

नाचणे-नारायणमळी परिसरालगत असलेल्या वाडेकरवाडीत सुमारे ५० ते ६० घरे आहेत. अनेक वर्षांपासून वाडीतील स्मशानभूमीची दुरवस्था, अंतर्गत रस्ते व पाखाड्यांची समस्या तसेच वीज वितरणाशी संबंधित प्रश्न प्रलंबित होते. या प्रश्नांकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून विविध कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आपत्ती विकास कार्यक्रमांतर्गत पाच लाख रुपयांची पाखाडी मंजूर करण्यात आली आहे. तसेच एका घराजवळून गेलेली हायटेन्शन वीजवाहिनी आणि धोकादायक विद्युत खांब बदलण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला. वाडीतील स्मशानभूमीचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.

या विकासकामांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप सुर्वे, तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, शहराध्यक्ष दादा ढेकणे, तालुका सरचिटणीस संकेत कदम आणि तालुका उपाध्यक्ष दिनेश रेमुळकर यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.

वाडीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेशामुळे नाचणे परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button