कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गावागावात देशभक्त निर्माण करा; भाजप कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

रत्नागिरी – संघटन मजबूत करण्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विकासकामांची आणि विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करावे. गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धन अर्पण करून पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा आणि आढावा बैठक रत्नागिरी येथे झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार आहे. नगर परिषदांमध्येही भाजपचे नगरसेवक, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता संघटनवाढीवर अधिक भर द्यावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे तसेच सर्वसामान्यांसाठी सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.

कोकणातील तरुणांना रोजगारासाठी विशेष प्रयत्न

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील स्थानिक तरुणांना शासकीय भरतीमध्ये अधिकाधिक संधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. कोकणासाठी शासकीय भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य मिळाल्यास बंद असलेली घरे पुन्हा उघडतील आणि तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कोकणातील तरुणांना शासकीय तसेच खासगी संस्थांमध्ये अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत ठराव मांडण्यात आला. या ठरावाला उपस्थितांनी एकमताने संमती दिली.

एसआयआर प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी लक्ष घालावे

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी एसआयआर प्रक्रियेची माहिती देताना मतदार यादीत अद्याप नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांनी ती दाखल करून घ्यावीत, असे आवाहन केले. एसआयआर प्रक्रियेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जातीनिशी लक्ष घालून काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 ‘शत प्रतिशत भाजप’चे लक्ष्य

भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्ह्यात भाजपचे प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडल्याचे सांगितले. प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रशिक्षण घेतले असून आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यात ‘शत प्रतिशत भाजप’ करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, माजी आमदार डॉ. विनय नातू, आमदार निरंजन डावखरे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष बिजली खान, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button