कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयसामाजिक

कोकणवासीयांचं स्वप्न अखेर साकार; CSMT- सावंतवाडी एक्स्प्रेस नियमित सुरु

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणेंच्या हस्ते हिरवा झेंडा; मुंबई-कोकण प्रवास होणार अधिक सुखकर

मुंबई – कोकणवासीय आणि चाकरमान्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोडदरम्यान बहुप्रतीक्षित नवीन नियमित एक्स्प्रेस सेवेचा गुरुवारी औपचारिक शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासूनची कोकणवासीयांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

CSMT येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.

खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियमित रेल्वेसेवा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईसह कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक 15087 CSMT-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि 15088 सावंतवाडी रोड-CSMT एक्स्प्रेस अशी ही सेवा दररोज धावणार आहे.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.

या नियमित रेल्वेमुळे मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार असून, कोकणवासीयांकडून या सेवेचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button