आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

फणसवळे गोहत्या प्रकरणाचा पर्दाफाश; दोघे अटकेत, दोघे फरार

पोलिसांवर हत्यार उगारल्याचा आरोप; एकाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे परिसरात गोहत्या सुरू असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून दोघांना अटक केली. या कारवाईदरम्यान आणखी दोघे संशयित जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावरून गोमांस आढळून आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बुधवारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास करबुडे हायवे परिसरातील फणसवळे मधलीवाडी, खुरीचा आंबा येथे मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर गोहत्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना गस्ती दरम्यान मिळाली. माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

पोलिसांनी सापळा रचत मोहसीन बाबू कुरेशी (मुंबई) आणि शहनशाह अब्दुल सत्तार शेख (मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले. तर अस्लेम आणि देवा अशी नावे सांगितलेले दोन संशयित आरोपी पोलिसांची चाहूल लागताच जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

या कारवाईदरम्यान कुरेशी याने पोलिसांवर हत्यार उगारल्याची, तर शेख याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोघांनाही ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना गोमांस आढळून आले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या गोहत्या आणि तस्करीच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, पोलीस अंमलदार संकेत महाडिक, पोलीस हवालदार सागर साळवी आणि स्वप्निल तेरवणकर यांनी सहभाग घेतला.

अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, गोहत्या आणि तस्करीचे जाळे किती मोठे आहे आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत. फरार संशयितांचा शोधही सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर संबंधित आरोपींवर कोणती कारवाई होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button