गावच्या चिमुकल्यांसाठी ‘आनंदाचं अंगण’; चार अंगणवाड्यांना नवी झळाळी
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार; १७ अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण

रत्नागिरी- ग्रामीण भागातील चिमुकल्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरणात शिक्षणाची सुरुवात व्हावी, यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील **गोळप आणि कोळंबे परिसरातील चार नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
फिनोलेक्स कंपनीच्या ४५ वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने सीएसआर उपक्रमांतर्गत हा अंगणवाडी नूतनीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.
या टप्प्यात गोळप मोहल्ला (उर्दू माध्यम) अंगणवाडी तसेच कोळंबे येथील वाकीवाडी, मांडवकरवाडी आणि गोरीवलेवाडी या चार अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारतीची दुरुस्ती, आकर्षक रंगकाम, बालकांना माहिती देणाऱ्या ‘बोलक्या भिंती’, शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक मूलभूत सुविधांमुळे या अंगणवाड्यांना बालमैत्रीपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, गोळप- दाभिळवाडी आणि कोळंबे-बागवाडी येथील आणखी दोन अंगणवाड्यांच्या नूतनीकरणाचे काम तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत आतापर्यंत एकूण १७ अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यापूर्वी फणसोप, रनपार, गोळप, पावस आणि कोळंबे परिसरातील १३ अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
अंगणवाडी ही बालविकासाची पहिली पायरी असल्याने जुन्या आणि दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या अंगणवाड्यांना या उपक्रमातून नवी ऊर्जा मिळत आहे. स्वच्छ परिसर, सुधारित पायाभूत सुविधा, आकर्षक शैक्षणिक भिंती आणि बालमैत्रीपूर्ण वातावरणामुळे चिमुकल्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना मिळणार आहे.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. अंगणवाडी नूतनीकरणाचा हा उपक्रम ग्रामीण भागातील बालशिक्षण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असून, पालक आणि ग्रामस्थांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास आकाशवाणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे स्टेशन डायरेक्टर डॉ. सुनील गायकवाड, कार्यक्रम अधिकारी श्री. विवेक वानखेडे, श्री. सुहास नंदुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. केदार चव्हाण व श्री. संदीप पाटील, ॲड. गौरव महाजनी व ॲड. रुची महाजनी, तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे श्री. रामबाबू संका, श्री. सागर चिवटे, श्री. नंदकुमार शिंपी, श्री. अमित घोरपडे आणि श्री. आशिष आठवले उपस्थित होते. स्थानिक सरपंच, अंगणवाडी सेविका, पालक, ग्रामस्थ तसेच मुकुल माधव फाऊंडेशनचे **श्री. शुभम भेगडे, श्री. शामराव निंबाळकर आणि श्री. वरद गोरे यांचीही उपस्थिती होती.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



