Uncategorizedआरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

क्षयरुग्णांना दरमहा पोषण आहार किट; ‘निक्षय मित्र’ उपक्रमातून फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनचा पुढाकार

रत्नागिरी – क्षयरोगमुक्त रत्नागिरीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने उपचाराखालील क्षयरुग्णांना दरमहा पोषण आहार किट देण्यात येत आहे. जिल्हा क्षयरोग केंद्राच्या सहकार्याने ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सन २०२२ पासून रत्नागिरी जिल्ह्यात हा उपक्रम सुरू असून, सध्या दरमहा सुमारे ६०० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचा लाभ दिला जात आहे. उपचाराच्या काळात औषधोपचारासोबत पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असल्याने रुग्णांच्या आरोग्याला आधार देण्याच्या उद्देशाने हे किट वितरित केले जाते.

याच उपक्रमांतर्गत राजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी, प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे, ग्रामीण रुग्णालय राजापूर तसेच लांजा येथील उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे CSR अधिकारी शामराव निंबाळकर यांच्या उपस्थितीत किटचे वितरण झाले. यावेळी जिल्हास्तरावरील अधिकारी, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय राजापूर व लांजा येथील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच उपचाराखालील क्षयरुग्ण उपस्थित होते.

मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आरोग्य क्षेत्रात तपासणी, वैद्यकीय उपचार, पोषण सहाय्य आणि आरोग्य जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे.

क्षयरोगाच्या उपचारादरम्यान योग्य पोषण, मानसिक आधार आणि सामाजिक सहकार्य महत्त्वाचे असल्याने ‘निक्षय मित्र’ उपक्रमातून रुग्णांना मदतीचा हात दिला जात आहे. क्षयरोगमुक्त रत्नागिरी आणि क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभाग, उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि समाजातील विविध घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button