कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयसामाजिक

लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीत ‘स्वराज्य पर्व’; दोन दिवस रत्नागिरीत सांस्कृतिक आणि वैचारिक मेजवानी

त्नागिरी- स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी रत्नागिरीत २३ आणि २४ जुलै २०२६ रोजी भव्य **’स्वराज्य पर्व’** आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या या दोन दिवसीय सोहळ्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समतामूलक, समरस आणि सर्वसमावेशक समाजाचा संदेश देणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक, वैचारिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या **’मन की बात’** संकल्पनेवर आधारित विशेष चित्रकला प्रदर्शन हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. नवी दिल्लीचे सुप्रसिद्ध चित्रकार सरदार मनजीत सिंह यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन २३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होऊन २४ जुलैपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

याशिवाय, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेले मुंबईचे रंगकर्मी मुजीब खान यांच्या दिग्दर्शनाखाली **’लोकमान्य टिळक’**, **’रश्मिरथी’** आणि **’स्वामी विवेकानंद’** या विषयांवरील तीन विशेष नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत.

२३ जुलै रोजी चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर **’स्वराज्य’** स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. त्यानंतर **’स्वराज्य प्राप्तीत लोकमान्य टिळकांचे योगदान’** या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला असून दिवसाची सांगता लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील ९० मिनिटांच्या नाट्यप्रयोगाने होणार आहे.

२४ जुलै रोजी **’राष्ट्र निर्माणामध्ये लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान’** या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या **’रश्मिरथी’** या कालजयी काव्यावर आधारित १२० मिनिटांचे नाट्य आणि **’स्वामी विवेकानंद’** यांच्या जीवनावरील ९० मिनिटांचे नाटक रंगणार आहे.

या सोहळ्याला उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार नारायण राणे, माजी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, कवी संजय पंकज आणि राष्ट्रकवी दिनकर यांच्या स्नुषा कल्पना सिंह यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दिल्लीच्या **’राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास’** तर्फे आयोजित हा संपूर्ण सोहळा सर्वांसाठी विनामूल्य असून रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहून या सांस्कृतिक आणि वैचारिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अश्विनी कुमार चौबे यांनी केले.

कोकण ऑनलाईन

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button