कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

मासेमारी बंदी आता १५ ऑगस्टपर्यंत; विधानसभेत मत्स्यमंत्री नितेश राणेंची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई- राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यापुढे १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत मासेमारी बंदी लागू राहणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली.

 

मच्छीमारांच्या जीवित व वित्ताचे संरक्षण तसेच मत्स्यसंपदेचे संवर्धन हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि माशांच्या प्रजनन काळात होणारी मासेमारी रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या केंद्र व राज्य शासनाच्या नियमांनुसार १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मासेमारी बंदीचा कालावधी लागू होता. या काळात राज्याच्या सागरी हद्दीत यांत्रिक व यंत्रचालित मासेमारी नौकांना बंदी असते. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच लहान माशांची मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी रोखण्यासाठी हा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून सातत्याने केली जात होती.

गुजरात आणि महाराष्ट्र या शेजारील राज्यांमध्ये मासेमारी बंदीच्या कालावधीत एकसमान धोरण असणे आवश्यक असल्याचेही मंत्री राणे यांनी नमूद केले. अन्यथा एका राज्यातील नौका दुसऱ्या राज्याच्या जलक्षेत्रात घुसून बेकायदेशीर मासेमारी करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात मच्छीमारांकडून प्राप्त झालेल्या निवेदनानंतर जिल्हा समिती तसेच राज्य सल्लागार व सहनियंत्रण समितीकडून अहवाल मागविण्यात आले होते. या सर्व समित्यांनी १ जून ते १५ ऑगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी निश्चित करण्यास सकारात्मक अभिप्राय दिल्याची माहितीही नितेश राणे यांनी विधानसभेत दिली.

कोकण ऑनलाईन

29/06/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button