कोकणनगरलाच टार्गेट का?; शहरातील सर्वच अवैध गाळे-टपऱ्यांवर कारवाईची मागणी
नगर परिषदेच्या सभेत केतन शेट्ये यांचा प्रशासनाला थेट सवाल; १५ ऑगस्टपूर्वी अतिक्रमण हटविण्याचे आदेश

रत्नागिरी- रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत शहरातील अनधिकृत गाळे व टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत, अनधिकृत टपऱ्या फक्त कोकणनगरमध्येच आहेत का? शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?” असा थेट सवाल उपस्थित केला.
सभागृहात बोलताना केतन शेट्ये यांनी साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ आदी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे व टपऱ्या उभारण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र कारवाई केवळ कोकणनगर परिसरापुरती मर्यादित ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार कोकणनगरवासीयांवर अन्याय करणारा असून प्रशासनाने शहरातील सर्व भागांमध्ये समान निकषांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी नगर परिषदेने ९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचा उल्लेख केला. या जाहिरातीत अनधिकृत गाळे, टपऱ्या तसेच दुकानांसमोरील वाढीव छप्परे आणि अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचनांनुसार शहरभर प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शहरातील सर्व भागांतील अनधिकृत गाळे, टपऱ्या व अतिक्रमणांवर एकसमान आणि कठोर कारवाई करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही शेट्ये यांनी केली.
दरम्यान, या चर्चेनंतर नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी प्रशासनाला १५ ऑगस्टपूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व अनधिकृत गाळे व टपऱ्यांवरील कारवाई पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या. यासंदर्भातील ठरावालाही सभेत मंजुरी देण्यात आली असून, आगामी काळात शहरभर अतिक्रमणविरोधी मोहीम अधिक वेगाने राबविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकण ऑनलाईन 28/07/2026



