58 हजारांहून अधिक चिमुकल्यांना पोलिओचे संरक्षण कवच
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम विक्रमी यशस्वी; 58,815 उद्दिष्टापैकी 58,793 बालकांना पोलिओचे दोन थेंब

रत्नागिरी – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. 28 जून) रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेली मोहीम अत्यंत यशस्वी ठरली. जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 58,815 बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 58,793 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले तर उर्वरित बालकांना घरभेटीद्वारे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
या मोहिमेसाठी जिल्हाभरात 1,659 पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. 3,477 आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष लसीकरणासाठी कार्यरत होते, तर 346 पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांनी प्रत्येक बूथला भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली.
मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेच्या अंमलबजावणीत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर,सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शीतसाखळी कर्मचारी, स्वयंसेवक तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
तालुकानिहाय कामगिरी :
मंडणगड – 2,129, दापोली – 5,812, खेड – 5,844, गुहागर – 3,718, चिपळूण – 12,266, संगमेश्वर – 4,719, रत्नागिरी – 15,587, लांजा – 3,292 आणि राजापूर – 3,829 बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले.
या मोहिमेच्या यशामागे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राबविलेली व्यापक जनजागृती, गावोगावी प्रचार, पथनाट्य, समाजमाध्यमांद्वारे माहिती प्रसार, वर्तमानपत्रे, डिजिटल माध्यमे, आकाशवाणी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे महत्त्वाचे घटक ठरले. त्यामुळे जिल्हाभरात पोलिओ लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सहकार्य करणाऱ्या सर्व विभागांचे अभिनंदन करत, रत्नागिरी जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखल्याचे गौरवोद्गार काढले.
कोकण ऑनलाईन
29/06/2026



