नात्यांमध्ये न अडकता महायुतीसाठी कामाला लागा – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

रत्नागिरी- “नात्यांमध्ये अडकून पडु नका, नाहीतर गडबड होईल. राजेश सावंत आता भाजपचा भाग नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवा,” असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. “कोणाचा टेट्स काय आहे हे पाहण्याची गरज नाही. पक्षाने दिलेला सन्मान लक्षात ठेवून वरिष्ठांचा निर्णय मान्य करा आणि घराघरात पोहोचा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
हॉटेल विवेक येथे आयोजित महाल्युती निर्धार मेळावा येथे ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हा संयोजक अॅड. दीपक पटवर्धन, वैभव खेडेकर, राहुल पंडित, प्रशांत यादव, बिपिन बंदरकर तसेच महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, “धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहचले पाहिजे. ही ‘कार्यकर्त्यांची निवडणूक’ आहे आणि सर्वांनी मनात कोणताही परंतु न ठेवता युतीचा निर्णय मान्य करून एकत्र काम करणे अत्यावश्यक आहे.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “महायुतीच्या उमेदवारांविरोधात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्यांनी अर्ज मागे घ्यावेत. त्यांना समजावून सांगणे ही नेत्यांची जबाबदारी आहे.”
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार असल्याने, “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर विकासासाठी निधी सहज उपलब्ध होईल. विरोधक विजयी झाल्यास नुकसान होऊ शकते,” अशी सूचना त्यांनी केली.
कोकणाच्या विकासावर बोलताना त्यांनी सांगितले, “एमआयडीसीकडून अनेक प्रकल्प येत असून येणाऱ्या काळात दहा-पंधरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थलांतर थांबवण्यासाठी ही मोठी संधी आहे. नियोजन करून प्रचार करा आणि घरा-घरात पोहोचा.”
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



