“सोनं खरेदी थांबवणं हा उपाय नाही; गोल्ड मॉनिटरायझेशन स्कीम प्रभावीपणे राबवा” — सुवर्णकार प्रमोद खेडेकर यांची भूमिका

रत्नागिरी – पश्चिम आशियातील वाढता तणाव, तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयावर येणारा दबाव यामुळे देशात सोन्याच्या आयातीबाबत चिंता व्यक्त होत असताना, “भारतीयांनी सोनं-चांदी खरेदी टाळावी” अशा भावना काही स्तरांतून व्यक्त होत आहेत. मात्र, यावर रत्नागिरीतील प्रसिद्ध सुवर्णकार प्रमोद खेडेकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत, “सोनं खरेदी थांबवणं हा उपाय नसून सरकारने गोल्ड मॉनिटरायझेशन स्कीम प्रभावीपणे राबवावी,” अशी मागणी केली आहे.
प्रमोद खेडेकर म्हणाले की, भारतातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणावर सोने घरांमध्ये निष्क्रिय स्वरूपात पडून आहे. सरकारने हे सोने बँकांमध्ये जमा करण्यासाठी आकर्षक योजना आणून त्यावर व्याज द्यावे आणि तेच सोने बाजारात सुवर्णकारांना उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे विदेशी सोने आयात करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
त्यांनी पुढे सांगितले की, भारतामध्ये लाखो कुटुंबे सुवर्णकार व्यवसायावर आधारित आहेत. अनेक कुटुंबांना या व्यवसायाशिवाय दुसरा कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही. अशा परिस्थितीत “सोनं खरेदी करू नका” असा संदेश दिल्यास त्याचा थेट परिणाम सुवर्णकार, कारागीर आणि संबंधित उद्योगांवर होऊ शकतो.
“भारतात सोनं आणि चांदी ही केवळ चैनीची वस्तू नाहीत, तर ती पारंपरिक बचत आणि आर्थिक सुरक्षिततेचे साधन आहे. ग्रामीण भागात, मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आणि छोट्या व्यावसायिकांमध्ये सोनं हे सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक माध्यम मानले जाते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जागतिक आर्थिक संस्थाही सोन्याबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त करत आहेत. Goldman Sachs आणि JPMorgan सारख्या संस्थांनी आगामी काळात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी भावनिक दबावाखाली सोनं खरेदी थांबवली आणि पुढील काही महिन्यांत दर मोठ्या प्रमाणात वाढले, तर त्याचा सर्वात मोठा फटका सामान्य भारतीयांनाच बसू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
“इतिहास पाहिला तर आर्थिक संकटाच्या काळात सोनं हे संरक्षणात्मक मालमत्ता म्हणून काम करत आले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून निर्णय घेण्याऐवजी दीर्घकालीन आर्थिक वास्तव समजून घेतले पाहिजे,” असेही प्रमोद खेडेकर यांनी सांगितले.
देशहित महत्त्वाचे असले तरी, भारतीयांच्या पारंपरिक बचतीवर परिणाम होणार नाही आणि सुवर्णकार व्यवसायही टिकून राहील, अशा संतुलित धोरणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
11/05/2026



