जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी ॲड. महेंद्र मांडवकर यांची नियुक्ती

रत्नागिरी- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांच्या न्याय हक्कासाठी देशातील २२ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन’च्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांची निवड करण्यात आली आहे. असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष कैलास जगन्नाथ गोरे पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली. रत्नागिरीत प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हे नियुक्तीपत्र प्रदान केले. राष्ट्रीय सल्लागार आचार्य राहुलजी पंपळे महाराज यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
ग्रामीण महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी अभ्यासू आणि सक्षम असणे आवश्यक असून, सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्था राज्यभर सक्रिय असल्याचे प्रदेशाध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी यावेळी नमूद केले. या निवडीबद्दल बोलताना आचार्य राहुलजी पंपळे महाराज म्हणाले की, ॲड. मांडवकर यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
ॲड. महेंद्र मांडवकर हे सध्या निलेश सांबरे यांच्या ‘जिजाऊ’ संस्थेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मोफत रुग्णालय, रुग्णवाहिका सेवा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरणाचे उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. लायन्स क्लब आणि रत्नमित्र फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांचे कार्य व्यापक आहे. आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मांडवकर म्हणाले की, आगामी काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून प्रत्येक सदस्याला संघटनेशी जोडले जाईल आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आपण कटिबद्ध राहू.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांसाठी असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, लवकरच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे. सदस्यांचे अधिकार, मानधन, विकास निधी आणि सन्मान या मागण्यांसाठी लवकरच राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचेही संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



