रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांचा सूर चढला, प्रभाग ६ आणि ७ मध्ये उमेदवारी न दिल्यास बंडखोरीची चिन्हं

रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ आणि ७ या भागांत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे सूर उमटताना दिसत आहेत. दोन्ही प्रभागांमध्ये पक्षाला उमेदवारीची संधी मिळाली नाही, तर “मैत्रीपूर्वक लढत” देऊ, असा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
या भागात भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत असून, गेल्या काही वर्षांपासून पक्षाचे कार्यकर्ते सातत्याने जनतेत काम करत आहेत. तरीदेखील या प्रभागांमध्ये इतर घटकपक्षांना संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगताच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा स्वर उमटला.
प्रभाग क्रमांक ६ मधून प्राजक्ता रूमडे, तर प्रभाग क्रमांक ७ मधून निलेश आखाडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दोन्हींचा परिसरात चांगला जनसंपर्क असल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
प्राजक्ताताई रूमडे यांच्या पुढाकाराने घेतलेल्या बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतक एकत्र आले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की — “या दोन्ही प्रभागांपैकी किमान एक जागा भाजपाला मिळाली पाहिजे, अन्यथा आम्ही मैत्रीपूर्ण लढतीस तयार आहोत.”
या बैठकीला शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे उपस्थित होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
मात्र, स्थानिक पातळीवर उमटणारा हा आवाज पक्षाच्या निर्णयापूर्वीच अंतर्गत बंडखोरीकडे झुकतो आहे का, असा प्रश्न आता पडतोय. कार्यकर्त्यांचे मनोबल आणि संघटन दोन्ही जपण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने कोणता निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोकण ऑनलाईन



