पंढरपूर यात्रेस वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचा गेली सात वर्ष अनोखा उपक्रम..

देवरुख – भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने भरलेल्या देवरुख तालुक्यातील हजारो वारकऱ्यांनी पंढरपूरच्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी प्रस्थान केले. लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेच्या वतीने गेली सात वर्षे हा उपक्रम निस्वार्थ भावनेने राबवला जात असून यंदाही सुमारे 12 एसटी बसमधून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

या यात्रेचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या वेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, विधानसभा संपर्कप्रमुख रवी डोळस, वेदाताई फडके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, माजी सभापती जया माने आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

“मी माझ्या आई-वडिलांना पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही; मात्र माझ्या तालुक्यातील ज्येष्ठ माऊलींना विठुरायाचे दर्शन घडवण्याची संधी माझ्या हाती आली, हीच माझ्यासाठी खरी सेवा,” अशी भावना लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था अध्यक्ष सुरेश कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
वारकऱ्यांचा उत्साह, संस्थेचा सेवाभाव आणि आशीर्वादमय वातावरणात या यात्रेचे प्रस्थान संपन्न झाले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



