अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

मुंबई – राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, राज्यात ओला दुष्काळ घोषित करणे, जमिनीची माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख मदत, पिकांच्या नुकसानीसाठी एकरी ५० हजार भरपाई, घरांच्या नुकसानीसाठी ७० टक्के मदत आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या नुकसानीसाठी ७० टक्के भरपाई अशा मागण्या करण्यात आल्या.

शेतकरी व व्यापारी वर्गाला न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या हक्काची मदत तातडीने मिळाली पाहिजे, असा इशारा आंदोलनातून देण्यात आला. या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन



