कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

दसऱ्याच्या मुहूर्तावर नगर वाचनालयात ग्रंथपूजन…

दीपावलीपूर्वी नूतन वास्तूत वाचनालय कार्यान्वित- ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन इमारतीत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सरस्वती पूजन अर्थात ग्रंथपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते १०.०० या वेळेत वाचनालयाच्या नव्या वास्तूत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

वाचनालयाची नवी इमारत १२ हजार चौ.फुटांच्या क्षेत्रावर उभारण्यात आली असून, त्यातील तळमजल्याचे ४ हजार चौ.फुटाचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाचनालयाची १ लाख १५ हजार ग्रंथसंपदा नव्या वास्तूत हलविण्यात आली असून, दसऱ्याच्या औचित्याने या ग्रंथसंपदेचे पूजन करून स्वागत करण्यात येणार आहे.

“भूमिपूजनाच्या वेळी दीपावलीपूर्वी वाचनालय सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आज ग्रंथसंपदा पुन्हा नूतन वास्तूत परत आणण्यात आली आहे. वाचनालयाचा आत्मा असलेली ग्रंथसंपदा नव्या इमारतीत पाहणे हे समाधानकारक आहे,” असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

दि. १२ ऑक्टोबर २०२५ पासून वाचनालयाचा सुसज्ज वाचन विभाग कार्यान्वित करण्यात येणार असून, संपूर्ण वाचनालय फेब्रुवारी अखेरपर्यंत सज्ज होईल. त्यानंतर हे वाचनालय रत्नागिरीचे एक सुसज्ज सांस्कृतिक केंद्र म्हणून उभे राहील. मायदेश फाऊंडेशनच्या सहकार्याने वाचनालय अधिक आधुनिक आणि उपयुक्त करण्याचे काम सुरू आहे.सरस्वती पूजन व ग्रंथपूजन कार्यक्रमासाठी नागरिकांनी सकाळी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button