रत्नागिरीच्या अफसान मिरकरची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड!
कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा; मध्य प्रदेशातील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
रत्नागिरी – क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी, कठोर परिश्रम आणि सरावाच्या जोरावर रत्नागिरीच्या अफसान मिरकर याने मोठे यश संपादन केले आहे. कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचा खेळाडू असलेल्या अफसानची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. मध्य प्रदेश येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून, त्याच्या या निवडीमुळे रत्नागिरीच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील खेळाडूंसाठी आयोजित शालेय क्रिकेट स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे अफसानला राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमसह गोगटे महाविद्यालयाचे मैदान आणि वाटद-खंडाळा येथील मैदानावर झालेल्या स्पर्धांमध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. अखेर निवड समितीने त्याची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात निवड केली.
रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अफसानने यापूर्वीही आपल्या कामगिरीच्या जोरावर जिल्ह्याच्या १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघांत स्थान मिळवले होते. त्याचे सरावातील सातत्य, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळेच त्याला हे यश मिळाल्याचे कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षक तथा सचिव दीपक देसाई यांनी सांगितले.
या अॅकॅडमीने आजवर जिल्ह्याला १०० हून अधिक गुणवान क्रिकेटपटू दिले आहेत. अफसानच्या निवडीमुळे अॅकॅडमीच्या यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. अॅकॅडमीमध्ये सराव करताना रणजीपटू हरीष लाडे, महेंद्र सुर्वे, दिवाकर मयेकर आणि विनोद गावखडकर यांनी त्याच्याकडून कसून सराव करून घेतला.
अफसानच्या या यशाबद्दल अॅकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्र पाथरे आणि कार्याध्यक्ष रमेश कसबेकर यांनी त्याचे अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अफसानच्या या निवडीमुळे रत्नागिरीच्या क्रिकेट क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



