रत्नागिरी जिल्हा कारागृहातील २५ बंद्यांना प्लंबिंग कौशल्य विकास प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्रदान

रत्नागिरी – बंद्यांचे पुनर्वसन, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (FIL) आणि त्यांच्या सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (MMF) यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी ८० दिवसीय प्लंबिंग कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात १५ जून २०२६ रोजी झाली. या कार्यक्रमासाठी एकूण २९ बंद्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या २५ बंद्यांना २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित प्रमाणपत्र वितरण समारंभात स्किल इंडिया प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
हा उपक्रम जन शिक्षण संस्थान, रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा कारागृह प्रशासन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. बंद्यांना प्लंबिंगचे व्यावहारिक ज्ञान व कौशल्य प्राप्त करून देणे, तसेच कारागृहातून मुक्त झाल्यानंतर रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्री. सचिन पाटील यांच्यासह कारागृहातील अधिकारी उपस्थित होते. तसेच जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, श्रीमती निधी सावंत, अमृता शेट्ये आणि प्लंबिंग प्रशिक्षणाचे प्रशिक्षक भिकाजी नाटेकर उपस्थित होते.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने श्री. एस. रविंद्रन (Senior General Manager – Instrumentation), नंदकिशोर शिंपी (Plant HR Head) आणि. शामराव निंबाळकर (CSR officer) यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या बंद्यांनी जिल्हा कारागृह प्रशासन यांचे आभार मानले. या प्रशिक्षणामुळे नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, कारागृहातून मुक्त झाल्यानंतर रोजगार मिळविण्यासाठी किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बंद्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचे पुनर्समावेशन घडवून आणणे आणि त्यांना सन्मानाने व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सक्षम करणे, या सामाजिक बांधिलकीच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुकुल माधव फाउंडेशन, जन शिक्षण संस्थान आणि रत्नागिरी जिल्हा कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याचा हा सकारात्मक प्रयत्न आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



