आमदार किरण सामंत यांच्या आवाहनाला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वेरळमध्ये भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध बंधाऱ्यांच्या कामांचा शुभारंभ
लांजा – तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला लांजा तालुक्यातील शिवसैनिक आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वेरळ येथे शिवसेना शाखेच्या वतीने विविध बंधारे बांधण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
पावसाचे कमी प्रमाण आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, भूजल पातळी वाढविणे आणि पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने आमदार किरण सामंत यांनी केलेल्या आवाहनानुसार लांजा तालुक्यात बंधारे उभारण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. वेरळ शाखेनेही या उपक्रमात पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामाला प्रारंभ केला आहे.
या शुभारंभप्रसंगी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य मनिषा राखण, पंचायत समिती सदस्य दिपाली साळवी, ग्रामपंचायत सदस्य शरद चरकरी, सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच इक्बाल टोळे, वेरळ शाखाप्रमुख सीताराम पातेरे, उपशाखाप्रमुख दीपक खामकर, शामसुंदर पाताडे, महिला शाखा संघटिका स्मिता खामकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण सर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शाखा संघटनेचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जलसंधारणाच्या कामातून भूजल पातळी वाढविण्यासह भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



