जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषद १० ते १२ मे; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

रत्नागिरी- जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्यावतीने दि. १० ते १२ मे रोजी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे सकाळी १० ते रात्रौ १० या वेळेत जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी तसेच प्रक्रिया धारक, पशुपालक यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. १० मे रोजी सकाळी १० वाजता कृषी मंत्री अॕड. माणिकराव कोकाटे, तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत, यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री अॕड. आशिष जयस्वाल, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण (भैय्या) सामंत, सिंधुरत्न समृध्द योजना समिती अध्यक्ष दीपक केसरकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय भावे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये आंबा व शेतमाल उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीचे स्वतंत्र दालन, बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, विविध जातींचे पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्न विभागांची स्वतंत्र दालने, अत्याधुनिक कृषी यंत्रे अवजारे यांची स्वतंत्र दालने, कृषी निविष्ठा यांची स्वतंत्र दालने, खवय्यांसाठी रूचकर अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी अशी एकूण १६५ विविध गट, कृषी व कृषी संलग्न विभागांची प्रशस्त दालने असणार आहेत. या दालनांमध्ये प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दालनांच्या नोंदणीसाठी रोहन चोथे- ९८३४४८७१३८ व अमोल क्षीरसागर-८१८०८१३५६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
याबरोबरच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी विषयक विविध परिसंवाद, खरेदीदार-विक्रेता संमेलन इ. कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे. तसेच दि. १० मे २०२५ रोजी पौष्टीक तृणधान्ये व पारंपरिक अशा दोन्ही प्रकारात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांसाठी प्रवेश ६० इतक्या मर्यादित प्रतिस्पर्धी यांना सहभागी होता येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हर्षला पाटील ९४२२४४१५७१, गौरी शेरे, ८८३०६४८०७७ यांच्याकडे नावे नोंदविण्यात यावीत, यासाठी प्रवेश निःशुल्क आहे.
कृषी व कृषी संलग्न विविध योजनांची माहिती व प्रात्यक्षिके या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहेत. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे दि १० मे ते १२ मे या कालावधीत होणाऱ्या जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदे आयोजनच्या अनुषंगाने नियोजनासंदर्भात आढावा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्राकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार तसेच आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



