दिवाळीच्या तोंडावर किराणा महागाईचा फटका; रास्त धान्य दुकानांतून साखर, तेल, मैदा उपलब्ध करा!
ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन

रत्नागिरी- दिवाळीसह अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सणांसाठी आवश्यक असलेल्या किराणा वस्तूंच्या किमती वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक झळ बसत असून, शासनाने रास्त धान्य दुकानांमधून साखर, तेल, रवा, बेसन, मैदा आदी जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सणासुदीच्या काळात घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी साखर, तेल, रवा, बेसन, मैदा यांसारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मात्र, मागील महिन्यांच्या तुलनेत या वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या सणाच्या खर्चात भर पडत आहे. त्यातच भविष्यातील संभाव्य दुष्काळाच्या संकटाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासनाने योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.
कोकणातील जनता तेल, मैदा, रवा, बेसन यांसारख्या अनेक वस्तूंसाठी बाहेरील बाजारपेठांवर अवलंबून आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढल्यास ग्राहकांसमोर पर्याय मर्यादित राहतात. खासगी व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने वस्तू खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर येऊ नये, यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका ग्राहक पंचायतीने मांडली आहे.
रास्त धान्य दुकानांतून सणांसाठी आवश्यक किराणा साहित्य पुरेशा प्रमाणात आणि रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने नियोजन करावे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल आणि सणांचा खर्च आटोक्यात ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीने व्यक्त केली आहे.
या मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन, खजिनदार अनंत भडकमकर आदी उपस्थित होते.
ग्राहकांच्या हिताचे प्रश्न सातत्याने प्रशासनासमोर मांडणाऱ्या ग्राहक पंचायतीच्या या मागणीमुळे सणासुदीच्या काळातील वाढत्या महागाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



