Uncategorized

महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने रुजू

रत्नागिरी – महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांनी आज (दि.२६ मे) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे यांची बदली नागपूर प्रादेशिक कार्यालयात झाल्याने रिक्त झालेल्या पदावर सुनीलकुमार माने यांची पदोन्नतीद्वारे या पदावर नियुक्ती झाली आहे. यावेळी सुनीलकुमार माने यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मुलभूत वीज यंत्रणा अधिक सक्षम करत वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असा मानस व्यक्त केला आहे. 

सुनीलकुमार माने हे सन १९९४ मध्ये तत्कालीन एमएसईबी मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर पदोन्नतीने त्यांनी सहाय्यक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता अशा विविध पदावर कोल्हापूर, कल्याण, रत्नागिरी, सातारा येथे आपली सेवा बजावली आहे. त्यांना वीज क्षेत्राचा प्रदीर्घ असा तीस वर्षाचा अनुभव आहे. कोल्हापूर शहर विभागात कार्यकारी अभियंता पदावर असताना, वीज देयके, वसुली , वीज हानी आदी विषयांवर त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसीतील औद्योगिक ग्राहकांचे विविध प्रश्न सोडवले, 15 किलोमीटर खराब उच्चदाब वाहिनी बदलून अत्यंत कमी कालावधीत औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा सुरु केला.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनी भूमिगत करणे तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातील धोकादायक रोहित्रे स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्याने तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते. सुनीलकुमार माने यांच्या नेतृत्वात कोल्हापूर शहर विभागात प्रस्तावित 100 इलेक्ट्रिक बस चार्जिंगचा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात व 75 टक्के कामाची पूर्तता करणारा राज्यातील एकमेव विभाग ठरला आहे. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button