आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

मुकुल माधव विद्यालयाचा १६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शैक्षणिक गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेतील उल्लेखनीय वाटचाल

रत्नागिरी- मुकुल माधव विद्यालयाचा १६ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २०१० साली फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मुकुल माधव फाउंडेशनला १० एकर जागा उपलब्ध करून दिल्यानंतर या विद्यालयाची स्थापना झाली. अवघ्या १५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास आज ५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून, पावस परिसरातील दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून विद्यालयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कार्यक्रमात प्राचार्य रोहित देशपांडे यांनी विद्यालयाच्या १६ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पालक, शिक्षक व हितचिंतकांचे आभार मानले.

गेल्या १५ वर्षांत विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रीन स्कूल रँकिंग २०२५ मध्ये विद्यालयाने देशात नववा क्रमांक मिळवला असून, न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ग्रीन स्कूल कॉन्फरन्ससाठीही विद्यालयाला निमंत्रण प्राप्त झाले आहे.

“मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थी समुद्रकिनारा स्वच्छता, पुस्तकदान, आरोग्य जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे विद्यालयाने शिक्षण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात उल्लेखनीय प्रगती साधल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यालयाला सिल्व्हरझोन फाउंडेशनचा ‘अकॅडमिक ब्रिलियन्स अवॉर्ड’ तसेच देश अपनाये सहयोग फाउंडेशनचा ‘चॅम्पियन स्कूल अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. याशिवाय विद्यालयाने सलग सातव्या वर्षी एसएससी व एचएससी परीक्षांमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंद घर वृद्धाश्रम, फिनोलेक्स इंडस्ट्रीज येथे शैक्षणिक भेटी, हिंदुजा फाउंडेशनच्या सहकार्याने न्यूमिस्मॅटिक्स विषयावरील विशेष सत्र तसेच २२ जून रोजी मुकुल माधव फाउंडेशनतर्फे १८ वे वार्षिक आरोग्य तपासणी शिबिरही यशस्वीपणे आयोजित करण्यात आले.

यावेळी प्राचार्य रोहित देशपांडे म्हणाले, पालकांचा विश्वास, शिक्षकांचे समर्पण आणि व्यवस्थापनाचे भक्कम पाठबळ यामुळे विद्यालयाची यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि पर्यावरण-जागरूक नागरिक घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

वर्धापन दिनानिमित्त विद्यालयाच्या १६ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यात आला असून, आगामी काळातही उत्कृष्ट शिक्षणासह समाजाभिमुख आणि संवेदनशील नागरिक घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button