कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

रत्नागिरी पोस्टल विभागात नवे पर्व; ‘फ्री पिकअप’ सेवेला प्रारंभ

रत्नागिरी- भारतीय डाक विभागाच्या ग्राहकाभिमुख सेवांमध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची भर पडली असून रत्नागिरी डाक विभागाने १ जून २०२६ पासून ‘फ्री पिकअप’ सेवा सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या पार्सल व पत्रांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये येण्याची गरज भासणार नसून, डाक विभागाचे विशेष वाहन थेट ग्राहकांच्या ठिकाणी जाऊन संकलन करणार आहे.

सुमारे १७६ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या भारतीय डाक विभागाने बदलत्या काळानुसार आणि ग्राहकांच्या गरजांनुसार आपल्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा केली आहे. ई-कॉमर्स आणि पार्सल व्यवसायाच्या वाढत्या युगात डाक विभाग दरवर्षी लाखो पार्सलची यशस्वी हाताळणी करत असून, खासगी स्पर्धकांच्या उपस्थितीतही विश्वासार्हता आणि व्यापक नेटवर्कच्या बळावर आपली वेगळी ओळख कायम राखली आहे.

 

ग्राहकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत रत्नागिरी डाक विभागाने ही सेवा सुरू केली आहे. यासाठी विशेष वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून ते रत्नागिरी शहरासह एमआयडीसी परिसरात फिरून ग्राहकांकडून पार्सल व पत्रांचे संकलन करणार आहे.

 

या सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ व श्रम वाचणार असून व्यावसायिक ग्राहकांना अधिक जलद आणि सुलभ सेवा मिळणार आहे. तसेच BNPL (Book Now Pay Later) करार केलेल्या ग्राहकांना अशा विशेष सुविधांचा अधिक लाभ मिळणार असल्याने व्यवसायिक वर्गासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

 

रत्नागिरी डाक विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे नागरिक व व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. या सेवेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधीक्षक डाकघर रत्नागिरी विभाग श्री. ज्ञानेश कुलकर्णी, विपणन अधिकारी श्री. गजानन करमरकर, श्री. रवींद्र घडशी तसेच पोस्टमास्तर रत्नागिरी आणि हेड पोस्टमन, रत्नागिरी प्रधान डाकघर यांचे ग्राहकांनी विशेष आभार मानले आहेत.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button