कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

शिक्षणातूनच समाजपरिवर्तन शक्य : डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी

रत्नागिरी- शिक्षणामुळे समाजातील विषमता दूर होऊन समानता प्रस्थापित होऊ शकते. शिक्षणामध्येच परिवर्तनाची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी त्याकडे समाज बदलाचे प्रभावी साधन म्हणून पाहावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये शनिवारी हा समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या त्यागाची जाणीव ठेवून कृतज्ञ राहण्याचा सल्ला दिला. युवकांनी नव्या तंत्रज्ञानाला धाडसाने सामोरे जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी, असेही ते म्हणाले. रोजगारासाठी ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीवर भर देत प्रगती साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रासंगिकता स्पष्ट करताना त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी महाविद्यालयाने किमान ६० तासांचा विशेष अभ्यासक्रम सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन होत्या. सहसचिव श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाविद्यालय गीताने झाली.

८१८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

प्रास्ताविकात डॉ. विवेक भिडे यांनी माहिती देताना सांगितले की, मार्च-एप्रिल २०२५ मध्ये विविध शाखांमधून शिक्षण पूर्ण केलेल्या ८१८ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात येत आहे.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर यश मिळवण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयीन संस्कार आयुष्यात उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी मातृ, पितृ आणि गुरु यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी, तसेच आर्थिक नियोजन, शारीरिक व मानसिक आरोग्य याकडेही लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन केले.

प्रातिनिधिक स्वरूपात २८ विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विविध शाखांचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन प्राध्यापकांना पीएचडी प्रदान

डॉ. स्वप्नील जोशी आणि डॉ. मंगेश भोसले यांना वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी आपल्या मनोगतात संस्था, कुटुंब व मार्गदर्शकांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button