ब्रेकिंग न्यूज | रत्नागिरी साठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी- नगराध्यक्ष

रत्नागिरी- शहराच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा घनकचरा व्यवस्थापन (Waste Recycling Plant) प्रकल्प शासन स्तरावर मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्वापर होणार असून पर्यावरण प्रदूषणात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे शहरातील दुर्गंधी, रोगराई आणि अनियंत्रित कचरा ढिगाऱ्यांच्या समस्येत मोठी सुधारणा होणार असून भविष्यात रत्नागिरी हे स्वच्छ व हरित शहर म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पास मंजुरी मिळवून देण्यासाठी मा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे विशेष योगदान असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. तसेच राज्य शासनाच्या विकासाभिमुख भूमिकेबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
हा प्रकल्प केवळ कचरा व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून शहराच्या आरोग्यदायी, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी मजबूत पाया ठरेल, अशी ग्वाही रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने दिली आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
नगराध्यक्ष सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी नागरिकांनी सहकार्य व पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



