रत्नागिरी नगरपरिषदेत उपनगराध्यक्षांच्या शिवीगाळ प्रकरणी कारवाईची मागणी

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या वतीने रत्नागिरी नगरपरिषद येथे घडलेल्या उपनगराध्यक्षांच्या शिवीगाळ प्रकरणासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. संबंधित प्रकरणावर तात्काळ व योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महिला जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, उपनगराध्यक्ष समिर तिवरेकर, गटनेते राजू तोडणकर, नगरसेवक नितीन जाधव, सौ. मानसी करमरकर, सौ. सुप्रिया रसाळ, संदीप (बाबू) सुर्वे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, नगरपरिषदेमध्ये शिस्त, सुसंस्कृत राजकारण आणि लोकशाही मूल्यांचे पालन होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला धक्का बसत असून संबंधितांवर त्वरित चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



