आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

‘जय भंडारी चषक कमिटी’ ठरली देवदूत! कर्णबधिर चिमुकल्या अनिशला दिलं ऐकण्याचं आणि बोलण्याचं नवं आयुष्य

रत्नागिरी – रत्नागिरीतील सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरलेल्या जय भंडारी चषक कमिटीच्या मदतीमुळे जन्मजात कर्णबधिर असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या अनिश आग्रेला ऐकण्याचे आणि भविष्यात बोलण्याचे नवे आयुष्य मिळाले आहे. या माणुसकीच्या कार्याबद्दल संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून कमिटीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरीतील राजेंद्र आग्रे आणि सौ. अक्षदा आग्रे हे दाम्पत्य जन्मजात कर्णबधिर व मुकबधिर आहे. नियतीने त्यांच्यावर आणखी एक आघात केला, जेव्हा त्यांचा अवघ्या दोन वर्षांचा मुलगा अनिश हाही कर्णबधिर असल्याचे निदान झाले.

मात्र, डॉक्टरांनी योग्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास अनिशला ऐकू येऊ शकते आणि तो भविष्यात बोलूही शकतो, अशी आशा व्यक्त केली. परंतु या अत्यंत खर्चिक शस्त्रक्रियेसाठी आणि पुढील उपचारांसाठी मुंबईला जाणे आवश्यक होते. आग्रे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हा खर्च उचलणे त्यांच्यासाठी अशक्य होते. अखेर त्यांनी आपल्या मुलाच्या उपचारासाठी समाजाकडे मदतीचे आवाहन केले.

ही माहिती मिळताच जय भंडारी चषक कमिटीने कोणताही विलंब न लावता आग्रे कुटुंबाची भेट घेतली आणि शस्त्रक्रिया तसेच औषधोपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत सुपूर्त केली. या मदतीमुळे अनिशला वेळेत मुंबईला नेऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य झाले.

आज या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांसह कमिटीच्या सामाजिक योगदानामुळे अनिशची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे तो आता एका सामान्य मुलाप्रमाणे ऐकू आणि भविष्यात बोलू शकणार असल्याने आग्रे कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

या संकटातून बाहेर पडल्यानंतर आग्रे कुटुंबीयांनी जय भंडारी चषक कमिटीचे मनःपूर्वक आभार मानले. “तुमच्या मदतीमुळे आमच्या मुलाला नवजीवन मिळाले,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विशेष म्हणजे,जय भंडारी चषक कमिटीही केवळ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणारी संस्था नसून सामाजिक कार्यातही सातत्याने अग्रेसर आहे. गेल्या सहा वर्षांपासून क्रिकेट व इतर स्पर्धांमधून मिळणारा निधी स्वतःकडे न ठेवता समाजातील गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी खर्च करण्याचा स्तुत्य उपक्रम ही कमिटी राबवत आहे.

या कार्यात प्रसाद भुते, बंटी चवंडे, पिंट्या मांजरेकर, तेजस बिर्जे, राज सुर्वे, शिवम शिवलकर, आशिष शिरगावकर, निलेश डोंगरे आणि दर्शन वांदरकर हे सदस्य सक्रियपणे योगदान देत आहेत.

एका चिमुकल्या मुलाचे आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या जय भंडारी चषक कमिटीच्या या माणुसकीच्या कार्याचे आज रत्नागिरीसह सर्व स्तरांतून मनापासून कौतुक होत असून, समाजापुढे त्यांनी संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button