सतत बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीचा फायदा घ्या; कोकणवासीयांनी संघटित व्हावे : संजय कोकरे

रत्नागिरी – कोकणातील विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा योग्य फायदा घेत कोकणवासीयांनी आपल्या हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठवावा, असे आवाहन स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले.
कोकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देश व राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र धोरण राबविण्याची ही योग्य वेळ आहे. स्थानिक युवकांना रोजगार, मत्स्यव्यवसाय, शेती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य तसेच मूलभूत सुविधांबाबत ठोस निर्णय होणे आवश्यक असून, ही संधी गमावल्यास भविष्यात कोकणासमोरील समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.
कोकणातील नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रस्तावित अणुप्रकल्पाला विरोध करत व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही, यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र कोकणराज्य अभियानाच्या माध्यमातून कोकणातील विविध प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे, जनजागृती करणे आणि लोकशाही मार्गाने न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे कोकरे यांनी स्पष्ट केले. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र येऊन प्रभावी दबावगट निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



