चिकन सेंटर, फळ विक्रेत्यांवर नगरपरिषदेचा ‘वचक’; कडक नियमावलीची तयारी
गोगटे कॉलेज परिसरातील धोकादायक होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश; सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी – शहरातील चिकन सेंटर, फळ विक्रेते तसेच रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी कठोर नियमावली तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी नगर परिषदेच्या मासिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच गोगटे कॉलेज परिसरातील अपघातास कारणीभूत ठरू शकणारी धोकादायक होर्डिंग्ज तातडीने हटविण्याचे आदेश नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी प्रशासनाला दिले. सभेत शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
नगरपरिषदेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने मंगळवार बाजार, मच्छी मार्केट तसेच रस्त्यालगत फळे, भाजीपाला व अन्य वस्तू विक्रेत्यांकडून शुल्क वसुलीच्या कामाचा मुक्त लिलाव करण्याबाबत चर्चा झाली. संबंधित ठेकेदाराकडून आठ महिन्यांची संपूर्ण रक्कम आगाऊ भरून घेण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
शहरात अनेक ठिकाणी चिकन विक्रेते व फळ विक्रेते अनधिकृतपणे व्यवसाय करत असून त्यामुळे वाहतूक आणि नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर अशा सर्व विक्रेत्यांसाठी एकसमान व कठोर नियमावली तयार करून त्यानुसारच ना हरकत दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरपरिषद इमारतीत हिरकणी कक्ष सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. समर्थ भारत अभियानांतर्गत आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व सूर्यनमस्कार स्पर्धांनाही सभेने मान्यता दिली. श्री भगवती देवी किल्ले रत्नागिरी परिसरात पाण्यासाठी विहीर अथवा विंधन विहीर खोदण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
शहरातील प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्पासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्या सूचनेनुसार नवीन इमारतींना वीजपुरवठ्यासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर न बसवता संबंधित इमारतीच्या जागेतच बसविणे बंधनकारक करण्याचा ठरावही मंजूर झाला.
नगरसेवक सौरभ मलुष्ते यांनी नगरपरिषदेच्या स्ट्रीट लाईटच्या खांबांवर खाजगी कंपन्यांनी टाकलेल्या टीव्ही व इंटरनेट केबल्सचा मुद्दा उपस्थित केला. या अवैधरित्या टाकलेल्या केबल्स तातडीने हटविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
आयत्या वेळच्या विषयात ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी स्टेट बँक कॉलनीतील नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानाला स्वर्गीय नाना खोत यांचे नाव देण्याची मागणी केली. नगरसेवक केतन शेट्ये व प्रदीप साळवी यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने त्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.
नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी फगर वठार येथे नव्याने उभारलेली संरक्षक भिंत पहिल्याच पावसात कोसळल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पत्रानुसार गोगटे कॉलेज परिसरात उभारण्यात आलेली मोठी होर्डिंग्ज धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी ती तात्काळ हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सभेतील या निर्णयांमुळे शहरातील अनधिकृत व्यवसाय, वाहतूक शिस्त, पाणी संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



