नाट्य परिषद करंडक’साठी रंगणार राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
महाराष्ट्रातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ; अंतिम फेरी २८ ऑक्टोबरला मुंबईत, प्रथम क्रमांकासाठी एक लाखांचे पारितोषिक
मुंबई – रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील कलावंत, नाट्यकर्मी आणि हौशी नाट्यसंस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या स्पर्धेची माहिती दिली. उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
मागील वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर तब्बल २५८ एकांकिका सादर झाल्या होत्या. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मार्गदर्शनाखाली नाट्य कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेमुळे अंतिम फेरीतील एकांकिकांचा दर्जा उंचावला.
मागील वर्षीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करण्यात आले. या नाटकाचे आतापर्यंत १०० नाट्यप्रयोग झाले असून त्यापैकी २५ प्रयोग महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या विविध शाखांमध्ये सादर करण्यात आले आहेत.
यंदाची स्पर्धा प्राथमिक, विभागीय आणि अंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी सप्टेंबरअखेर महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. त्यातून निवड झालेल्या एकांकिकांची विभागीय फेरी घेतली जाणार असून अंतिम फेरी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा-माहीम, मुंबई येथे होणार आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी विशेष नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्री या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीतील एकांकिकांचे सादरीकरण अधिक दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकांकिका स्पर्धेचे केंद्र उपलब्ध करून देण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका प्राप्त होतील, त्या जिल्ह्यात स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. या उपक्रमातून महाराष्ट्रातील गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच सर्वोत्तम एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करण्यासाठी नाट्य परिषद प्रयत्नशील राहणार आहे.
प्रथम क्रमांकासाठी एक लाखांचे पारितोषिक
अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट एकांकिकेला १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ५० हजार रुपये, तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय लेखन, दिग्दर्शन, स्त्री अभिनय, पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा आणि वेशभूषा आदी विविध विभागांमध्ये वैयक्तिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
दोन अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये व प्रमाणपत्र, तर लक्षवेधी अभिनेता स्त्री व पुरुष यांना प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांना सहभागपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी १ हजार रुपये असून प्रवेश प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. स्पर्धेची माहिती व नियमावली [www.natyaparishad.org](http://www.natyaparishad.org) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२६ आहे.
विद्यार्थी, कलावंत, महाविद्यालये, हौशी नाट्यसंस्था, विद्यापीठे तसेच महाविद्यालयांमधील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



