प्रगतीसाठी तेली समाज संघटित; कोल्हापुरातील चिंतन शिबिरात १८ मागण्यांचे निवेदन

कोल्हापूर – तेली समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाज संघटित होत असून, समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्यस्तरावर ठोस भूमिका घेण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या नेतृत्वाखाली रविवारी (२३ ऑगस्ट) झालेल्या या शिबिराला राज्यभरातून तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतून तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे उपाध्यक्ष संजय विभुते, कार्याध्यक्ष गजानन शेलार, महासचिव भूषण कर्डीले आणि राज्याध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या १८ प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाला सादर करण्यात आले.
शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची एकाच व्यासपीठावर झालेली उपस्थिती. दोन्ही नेत्यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून तसेच विरोधी पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, जिल्हायुवाध्यक्ष समीर महाडिक यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे उपाध्यक्ष संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी सेलचे राज्याध्यक्ष पोपटराव गवळी, राज्य युवा उपाध्यक्ष निलेश संकपाळ, पश्चिम महाराष्ट्र युवाध्यक्ष संदीप मुंढेकर, विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लोखंडे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्ह्यातील समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
कोकण ऑनलाईन
24/08/2026



