कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

पराकोटीच्या दिव्यांगत्वावर मात करत देवेश कुळयेचे घवघवीत यश; बारावीत ७९ टक्के गुण

लांजा- असंख्य अडचणींवर मात करत, जिद्द, मेहनत आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर लांजा तालुक्यातील बेणी येथील कु. देवेश अजित कुळये याने बारावीच्या परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जन्मतः अस्थिव्यंग दिव्यांग असलेल्या देवेशच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून आरएचपी फाउंडेशनतर्फे त्याचा व कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

देवेश कुळये (वय १८) हा बेणी, ता. लांजा येथील रहिवासी आहे. जन्मापासूनच त्याचे दोन्ही पाय कमरेपासून खाली लुळे असून त्याला चालता येत नाही. त्यामुळे दैनंदिन कामांसाठी त्याला आईची मदत घ्यावी लागते. वडील अजित कुळये हे पूर्वी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये काम करत होते. कृषी क्षेत्राची आवड असल्याने ते २०१६ पासून लांजा येथील धनावडे नर्सरीमध्ये कार्यरत आहेत. आई ज्योत्स्ना कुळये गृहिणी असून लहान भाऊ विघ्नेश हा सहावीत शिक्षण घेत आहे. कुटुंबात आजी मंदाकिनी कुळये यांचाही समावेश आहे.

 

देवेशच्या शिक्षणात त्याच्या आईने मोलाची भूमिका बजावली. सुरुवातीच्या काळात ती त्याला उचलून शाळेत घेऊन जात असे. तिसरीपासून व्हीलचेअरच्या सहाय्याने त्याचा शाळेचा प्रवास सुरू झाला. अनेक अडचणींना सामोरे जात त्याने दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळवले होते. यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथून बारावी (वाणिज्य शाखा) शिक्षण पूर्ण करताना त्याने ७९ टक्के गुणांची कामगिरी नोंदवली. बेणी ते लांजा असा रोजचा प्रवासही त्याची आई रिक्षाने करून देत होती.

 

स्वतःची जिद्द, आई-वडिलांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर देवेशने हे यश मिळवले असून भविष्यात बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची त्याची इच्छा आहे.

 

देवेशच्या या यशाबद्दल रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे, शांताराम लाड, विजय पावसकर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

04/06/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button