आरोग्यकोकणपर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयसामाजिक

गणपतीपुळेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कचऱ्याच्या ढिगांमुळे पर्यटनस्थळाची प्रतिमा धोक्यात

रत्नागिरी- कोकणातील प्रमुख आणि राज्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळे परिसरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक आणि भाविक गणपतीपुळे येथे भेट देत असताना परिसरातील अस्वच्छतेमुळे या पर्यटनस्थळाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गणपतीपुळे परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून स्थानिक नागरिक, पर्यटक, भाविक, ग्रामपंचायत तसेच मंदिर समिती यांचीही असल्याचे मत व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी टाकला जाणारा कचरा, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे समुद्रकिनारा व परिसराचे सौंदर्य कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

गणपतीपुळे हे कोकणातील क्रमांक एकचे पर्यटनस्थळ मानले जाते. त्यामुळे येथील स्वच्छता, शिस्त आणि पर्यावरण संवर्धन याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने गणपतीपुळे विकास आराखडा तयार केला होता. मात्र त्या आराखड्याचे पुढे काय झाले आणि त्यातील कामांची अंमलबजावणी कितपत झाली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

सध्या कोकणाला महायुती सरकारमधील चार मंत्र्यांचे प्रतिनिधित्व लाभले आहे. मंत्री उदय सामंत, नितेश राणे, योगेश कदम आणि अदिती तटकरे यांनी या विषयात लक्ष घालून गणपतीपुळेला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गणपतीपुळे परिसरात कचरा व्यवस्थापनासाठी कडक नियम, दंडात्मक कारवाई, जनजागृती मोहीम आणि नियमित स्वच्छता व्यवस्था राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. स्वच्छता आणि शिस्त यांचा आदर्श निर्माण झाल्यास कोकणाचे नाव देशभर अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

04/06/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button