कोकणपर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन 

कोकणात प्रदूषणकारी रासायनिक प्रकल्पांना विरोध; शेती, मत्स्य व कृषी पर्यटनाला चालना देण्याची मागणी

रत्नागिरी- कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंबा बागायतदार संघटनेचे नेते बावा साळवी यांनी सहकाऱ्यांसमवेत रत्नागिरी दौऱ्यावर आलेले रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात कोकणातील आंबा, काजू, मच्छी, नारळ, सुपारी, मसाल्याची पिके, हळद, कोकम आदी उत्पादनांना योग्य बाजारपेठ व हमीभाव उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी मोठ्या कष्टाने आणि जीव धोक्यात घालून शेती करीत असतानाही त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

 

कोकणातील देवगड, जैतापूर, बारसू, पूर्णगड, वाटद आदी भागांमध्ये प्रस्तावित प्रदूषणकारी व विनाशकारी रासायनिक उद्योगांना विरोध दर्शवित, त्याऐवजी पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, कृषीसंवर्धन तसेच कृषी पर्यटनाला चालना देणारे उद्योग उभारावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच आंबा व काजू पिकांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्रे सुरू करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

आंबा व काजू नुकसानभरपाई देताना ई-पीक पाहणी किंवा फार्मर आयडीची सक्ती करू नये, तसेच विद्यमान पीक विमा योजनेचे निकष कोकणातील शेतीसाठी अयोग्य असल्याने त्यात बदल करून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशीही मागणी करण्यात आली.

 

शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना प्रति आंबा झाडामागे किमान पाच हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व बँकांना द्यावेत, सर्व बँकांसाठी समान नियम लागू करावेत तसेच व्याज अनुदानाची मर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

 

यावेळी कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ तसेच पावस परिसर आंबा उत्पादक संस्थेच्या पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

25/06/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button