जेन झी अन् जेन अल्फाला मिळणार दर्जेदार चित्रपटांचे संस्कार
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजचा मोठा उपक्रम; महाराष्ट्रात १०० कॅम्पस फिल्म सोसायटी स्थापन करण्याचा निर्धार

रत्नागिरी – जेन झी आणि जेन अल्फा पिढीला दर्जेदार चित्रपटांची ओळख करून देत त्यांच्यामध्ये ‘व्हिज्युअल लिटरेसी’ विकसित करण्यासाठी फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज (पश्चिम विभाग)ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिल्म क्लब स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात १०० कॅम्पस फिल्म सोसायटीज स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज (पश्चिम विभाग)च्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १५ ऑगस्टपासून या अभियानाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे सचिव सुधीर मुळ्ये आणि रत्नागिरी फिल्म सोसायटीचे डॉ. नितीन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून दिली.
कॉलेज व्यवस्थापन आणि प्राचार्यांच्या परवानगीने कॅम्पस फिल्म क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच सर्व विद्यापीठांनी या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फिल्म क्लब स्थापन करण्यास मान्यता दिली असून, लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या फिल्म क्लबच्या माध्यमातून तरुणांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. एफटीआयआयच्या सहकार्याने चित्रपट रसास्वाद शिबिरे, देशी-विदेशी चित्रपट महोत्सव, चित्रपट प्रदर्शनानंतर मुक्त चर्चा, लघुपट व अनुबोधपट महोत्सव, चित्रपटविषयक पुस्तक आणि पोस्टर प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल फेडरेशनचे अखिल भारतीय अध्यक्ष असताना हा विचार पुढे आला होता. मात्र, कोरोना काळात हा उपक्रम मागे पडला. आता हा विषय निर्धारपूर्वक पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात कलकत्ता येथे होणाऱ्या फेडरेशनच्या अखिल भारतीय बैठकीत हा मुद्दा ठामपणे मांडून हा उपक्रम देशभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान पाच फिल्म क्लब स्थापन करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



