रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर आता लिफ्टची सुविधा!
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह भाविकांचा किल्ल्यावरचा प्रवास होणार सुखकर

रत्नागिरी- रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आता लिफ्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी होणारी चढाई लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग पर्यटक आणि भाविकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेल्या श्री भगवती देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक रत्नागिरीत येतात. मात्र, किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या चढाईमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती.
ही अडचण पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आल्यानंतर पर्यटन विकास आराखड्यातून रत्नदुर्ग किल्ल्यावर लिफ्ट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सध्या या लिफ्टचेसुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. लिफ्टची सुविधा सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर भाविकांना किल्ल्यावर पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.
या सुविधेमुळे श्री भगवती देवीचे दर्शन अधिक सुखकर होण्यासोबतच रत्नदुर्ग किल्ल्याच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या पर्यटन विकासात लिफ्टची ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



