कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

सहाय्यक कामगार आयुक्तपदी निवड झालेल्या अजय तोडकर यांचा अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे गौरव

रत्नागिरी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत सहाय्यक कामगार आयुक्त (Assistant Labour Commissioner) या प्रतिष्ठित पदावर निवड झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे अकादमीच्या अभ्यासिकेतील नियमित स्पर्धा परीक्षार्थी श्री. अजय तोडकर यांचा गौरव व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर, अकादमीचे अध्यक्ष श्री. भरत ओसवाल, संस्थेचे नियामक मंडळ सदस्य ॲड. प्राची जोशी, सी ए मंदार गाडगीळ, श्री. सुहासभाऊ पटवर्धन, डॉ. केतकर, श्री. मनोज पाटणकर, अकादमीच्या समन्वयक ॲड. सोनाली खेडेकर, तसेच अकादमीचे अध्यापक श्री.तेजस कळंबटे, श्री.प्रथमेश वाडकर, कर्मचारी सौ. सोनाली मोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अजय तोडकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशामागील चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले.

सत्कारानंतर बोलताना श्री. अजय तोडकर यांनी आपल्या यशात अकादमीचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. “अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीने मला शांत आणि अभ्यासपूरक वातावरण, सुसज्ज मूलभूत सुविधा तसेच निरोगी व सहकार्यपूर्ण स्पर्धेचे वातावरण उपलब्ध करून दिले. याच वातावरणामुळे अभ्यासात सातत्य राखता आले आणि यशाचा मार्ग सुकर झाला,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अकादमीच्या समन्वयक ॲड. सोनाली खेडेकर यांनी अजय तोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष उल्लेख केला. “अजय सर हे अत्यंत शांत, सुस्वभावी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. स्वतःच्या तयारीतील अनुभव इतर स्पर्धा परीक्षार्थींना वेळोवेळी सांगून त्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची वृत्ती नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. अकादमीच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी कायम सहकार्याची भावना ठेवत संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी अकादमीतर्फे स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली. १० ऑगस्टपासून तलाठी भरती (MPSC गट ‘क’ परीक्षा) फास्टट्रॅक बॅच सुरू होत असून, अल्पावधीत प्रभावी व नियोजनबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

अजय तोडकर यांच्या यशामुळे अकादमीतील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी स्पर्धा परीक्षांसाठीही अनेक विद्यार्थ्यांना या यशातून प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button