आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कुटगिरी साकव दुर्घटनेनंतर प्रशासनाची युद्धपातळीवर हालचाल; तत्काळ इस्टिमेट सादर करण्याचे सभापती प्रणव पोळेकर यांचे आदेश.

गुहागर – गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी प्रशासनाला तातडीने नवीन पुलाचे इस्टिमेट सादर करण्याचे निर्देश दिले असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नवीन पूल लवकरात लवकर मंजूर करून त्याचे काम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.

सोमवारी सायंकाळी अचानक लोखंडी साकव कोसळल्याने कुटगिरी या दुर्घटनेत १० ते १२ गुरे जखमी झाली, तर एका बैलाचा मृत्यू झाला. सुदैवाने मानवी जीवितहानी टळली असली तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दुर्घटनेची माहिती मिळताच सभापती प्रणव पोळेकर यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले होते. जखमी जनावरांवर त्वरित उपचार करण्यात यावेत तसेच मृत जनावराच्या शेतकऱ्याला शासकीय मदत तातडीने देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार प्रांतअधिकारी व तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामे करून शासकीय मदत सुद्धा दिली.

दरम्यान, आज सकाळी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करत प्रशासनामार्फत आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेतला होता. त्यानंतर सायंकाळी सभापती प्रणव पोळेकर यांनी स्वतः भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी डेप्युटी इंजिनिअर आशुतोष सरदेसाई, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर तसेच संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने नवीन पुलाचे काम कोणत्याही विलंबाशिवाय सुरू व्हावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा शब्द सभापती प्रणव पोळेकर यांनी ग्रामस्थांना दिला.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button