आरोग्यकोकणपर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

रत्नागिरीत डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळल्याने धुराचे साम्राज्य; नागरिकांचा संताप, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

रत्नागिरी- शहरातील साळवी स्टॉप परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर मागील दोन दिवसांपासून कचरा जाळण्यात येत असल्याने संपूर्ण परिसर धुराने व्यापला आहे. या घटनेमुळे कोकण नगर, क्रांतीनगर, स्टेट बँक कॉलनीसह आसपासच्या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून श्वसनाच्या तक्रारी वाढत आहेत. नागरिकांनी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीपासून सकाळी सुमारे ९ वाजेपर्यंत दाट धूर परिसरात पसरलेला असतो. दुर्गंधीयुक्त धुरामुळे घरांचे दरवाजे-खिडक्या उघडणे अशक्य झाले असून घरातही धूर शिरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 

परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, कचऱ्याची अशा पद्धतीने विल्हेवाट लावणे पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. “शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना कचरा व्यवस्थापनाचा हा प्रकार अत्यंत खेदजनक आहे. देशातील पहिला जिल्हा विकास व हवामान कृती आराखडा राबवणाऱ्या रत्नागिरी शहरात अशी परिस्थिती असणे दुर्दैवी आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

 

नागरिकांची मागणी आहे की, डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळण्याची पद्धत तातडीने थांबवून वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन करावे. तसेच प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

 

दरम्यान, या प्रकारामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर श्वसनविकार व पर्यावरणीय परिणाम उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button