नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणनगरमध्ये मोफत आरोग्य शिबिर; ४०० नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी- कोकणनगर वॉर्ड क्रमांक ४ चे युवा नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त महापुरुष मित्र मंडळ, कोकणनगर यांच्या वतीने व माजी नगरसेविका कौसल्या केतन शेट्ये यांच्या प्रयोजनाने दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महात्मा गांधी शाळा क्रमांक २१, कोकणनगर येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका फौजीया तनवीर मुजावर व माजी नगरसेविका कौसल्या केतन शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून व नारळ वाढवून करण्यात आले. या शिबिरात सुमारे ४०० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

शिबिरामध्ये मधुमेह (शुगर), रक्तदाब, कॅन्सर, हाडांचे विकार तसेच इतर सामान्य आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, डायबेटीस, किडनी, लिव्हर आदी रक्ततपासण्या करण्यात आल्या. इन्फिगो आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डोळ्यांची तपासणीही करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका कौसल्या केतन शेट्ये यांनी आपल्या भाषणात महिलांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याने अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. नियमित तपासणीमुळे आजार वेळेत ओळखता येतात व भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात, असे त्यांनी सांगितले.
महापुरुष मित्र मंडळाचे सदस्य विशाल कदम यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या ३५ वर्षांपासून महापुरुष मित्र मंडळ हे हिंदू–मुस्लिम एक्याचे प्रतीक असून कोणताही जात-धर्म भेद न ठेवता सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. लहान मुलांसाठी कला स्पर्धा, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी पैठणी स्पर्धा, हळदी-कुंकू, नवरात्र उत्सव तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन मंडळामार्फत करण्यात येते. नागरिकांच्या आरोग्याच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष कै. उमेश शेट्ये यांच्या स्मृतींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या फौजीया तनवीर मुजावर व अन्य मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांना उपस्थित मान्यवर व नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महापुरुष मित्र मंडळ, कोकणनगर तसेच समता मित्र मंडळ, कीर्तीनगर येथील पुरुष, महिला व युवक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी व इन्फिगो आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांचेही आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याबाबत जागृती करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आयोजक व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
कोकण ऑनलाईन



