कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र

खेडशी-डफळचोळ वाडीत मध्यरात्री पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ! कुत्रा उचलून नेल्याच्या घटनेनंतरही वनविभाग सुस्त

सहा महिन्यांपासून ग्रामस्थ भयभीत

रत्नागिरी – नजिकच्या खेडशीतील डफळचोळ वाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, काल शनिवारी 1 नोव्हेंबर २०२५ मध्यरात्री १ वाजता बिबट्या पुन्हा एकदा खुलेआम वाडीत फिरताना ग्रामस्थांनी पाहिला. बिबट्याचे हे ताजे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये चित्रीत झाले आहे.या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, केवळ दोन दिवसांपूर्वी याच बिबट्याने एका ग्रामस्थाच्या दारातून कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली होती.

डफळचोळ वाडी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा सातत्याने वावर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट वस्तीत येत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाडीतील लहान मुले आणि पाळीव प्राणी धोक्यात आले आहेत.

सहा महिने बिबट्याचा वावर असताना आणि ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत असतानाही वनविभागाने या समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “कुत्रा उचलून नेल्याची ताजी घटना घडल्यानंतरही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. बिबट्याला त्वरित पकडून सुरक्षित स्थळी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button