जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी – मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी आणि कोकणच्या विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. जयगड बंदराला महाराष्ट्राच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनवण्यावर भर देत, नितेश राणे यांनी मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या कोकणी तरुणाईला रोजगार देण्याचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व देण्याचे आवाहन केले.

रत्नागिरीतील जयगड बंदरावर झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री नितेश राणे यांनी अनेक मोठे निर्णय जाहीर केले. या बैठकीचा मुख्य उद्देश जयगड बंदराचे महत्त्व वाढवणे हा होता. सध्या काजू, आंबा, आणि मासे यांचा मोठ्या प्रमाणावर होणारा निर्यात व्यापार जेएनपीए (JNPA) बंदरातून होतो, जे नवी मुंबईत आहे. यावर होणारा खर्च वाचवण्यासाठी जयगड बंदराला जेएनपीएसाठी एक सक्षम पर्याय म्हणून विकसित करण्याचे ध्येय आहे. यामुळे कोकणातील उत्पादनांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल आणि वाहतुकीचा खर्च कमी होईल.

या बैठकीत मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी, दिल्लीतील केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि जयगड बंदराचे अधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून जयगड बंदरातील उलाढाल वाढवून कोकणी लोकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.



