रत्नागिरीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली

रत्नागिरी – रत्नागिरी काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री, लोकप्रिय नेते आणि सर्वसामान्यांच्या हृदयात घर करणारे विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. शहर काँग्रेस अध्यक्ष अशफाक काद्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मराठवाड्यातील एका छोट्या खेड्यातून प्रवास सुरू करून राज्याचे मुख्यमंत्रीपद गाठणाऱ्या देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकरी, युवक, महिला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या लोकसंग्रही स्वभावामुळे आणि सर्वांना आपलेसे करण्याच्या वृत्तीमुळे ते जनतेच्या मनात सदैव जिवंत राहतील, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
“विलासराव देशमुख हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते जनतेचे खरे सेवक होते. त्यांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व, दूरदृष्टी आणि ठाम नेतृत्व आजही आम्हाला प्रेरणा देते,” अशा भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.
कोकण ऑनलाईन



