रत्नागिरीत लवकरच धावणार इलेक्ट्रिक बसेस; ७५ टक्के काम पूर्ण

रत्नागिरी- डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरांना पर्याय म्हणून आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी रत्नागिरीत लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या बसेससाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. उर्वरित कामही लवकर पूर्ण करून सेवा सुरू करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यावर भर दिला जात आहे. रत्नागिरीतही ही सेवा सुरू होण्याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या दापोली आगारात २१ इलेक्ट्रिक बसेस यशस्वीपणे सुरू आहेत. दापोली हे पर्यटनस्थळ असल्यामुळे या प्रकल्पाचा पहिला प्रयोग तेथे राबवण्यात आला होता. प्रवाशांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि इंधन बचतीचा फायदा लक्षात घेता हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे.
रत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे मुख्य केंद्र असल्याने येथे इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच एसटी महामंडळालाही इंधन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
16/05/2026



