कोकणक्रीडामहत्वाची बातमीमहाराष्ट्र

रत्नागिरीतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळणे गरजेचे- अर्जुन गद्रे

रत्नागिरी- ‘रत्नागिरीमध्ये उमद्या व होतकरू क्रिकेट खेळाडूंची कमतरता नाही. त्यांना उत्तम व्यासपीठाच्या माध्यमातून एक संधी मिळणे गरजेचे आहे. एक महिन्याच्या या समर क्रिकेट कॅम्प द्वारे ही संधी रत्नागिरीतील मुलांना प्राप्त झाली आहे, त्याचा जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमी खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन, गद्रे मरिन एक्स्पोर्ट प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री.अर्जुन गद्रे यांनी केले.

गद्रे मरिन एक्स्पोर्ट प्रा. लि आणि रत्नागिरी जेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील सर्वंकष विद्या मंदिर, कसोप, रत्नागिरी येथे उन्हाळी क्रिकेट शिबिराचे दिमाखात उदघाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी सर्वकष विद्या मंदिरच्या क्रिकेट प्रांगणावर हा सोहळा संपन्न झाला. सर्वकष विद्या मंदिर, कसोप, रत्नागिरी यांच्या माध्यमातून उत्तम शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने गेली ७-८ वर्षे उत्तम क्रीडा प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे प्रयत्न शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित न ठेवता रत्नागिरीतील इतर मुलांनाही याचा फायदा व्हावा यासाठी समर क्रिकेट कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. हे उन्हाळी शिबीर दिनांक २१ एप्रिल ते २० मे २०२५ यादरम्यान सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत दोन बॅचेस मध्ये घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीना येण्या जाण्यासाठी बसची सुविधा देखील पुरविण्यात आलेली आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांसोबत मुलींचा सहभाग देखील वाखाणण्याजोगा आहे.

सर्वंकष विद्या मंदिराचे क्रिकेट प्रशिक्षक श्री लक्ष्मीकांत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व रत्नागिरी जेट्स यांचे तर्फे श्री शुभम आणि श्री अमित हे दोन प्रशिक्षक सदर शिबिरामध्ये क्रिकेटचे धडे देणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एमपीएल निवड चाचणीदरम्यान, क्रिकेटच्या कौशल्याबरोबरच फिटनेसला देखील अनन्यसाधारण महत्व आहे, हे दिसून आले. त्या अनुषंगाने या शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थीची फिटनेस चाचणी देखील घेण्यात येणार आहे.

Oplus_131072

कार्यक्रमादरम्यान क्रिकेट प्रशिक्षणासाठी बनविण्यात आलेल्या इनडोअर व टर्फ विकेटचे औपचारिक उदघाटन श्री अर्जुन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, सहभागी शिबिरार्थीना टी शर्टसचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हा क्रिकेटचे माजी कर्णधार व गद्रे मरिनचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री अभिजित तळेकर, सर्वकष विद्या मंदिर, कसोप, रत्नागिरीच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका जैस्वाल यांनी शिबिरार्थीना शुभेच्छा दिल्या.

कोकण ऑनलाईन, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button