रत्नागिरीतील तरुणाच्या नावे १७८ कोटींचे व्यवहार, प्राप्तिकर विभागाची नोटीस
रत्नागिरी- शहरातील एका तरुणाला प्राप्तिकर विभागाने तब्बल १७८ कोटी रुपयांच्या व्यवहारप्रकरणी नोटीस बजावली आहे. या नोटिशीमुळे संबंधित तरुण हादरून गेला आहे. योगेश हळदवणेकर असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पॅन आणि आधार कार्डचा गैरवापर करून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील दोन कंपन्या स्थापन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या कंपन्यांचा संचालक बनवून त्याच्या नावावर कोट्यवधीचा व्यवहार केला आहे. यां कंपन्यांच्या खोट्या आर्थिक व्यवहारामुळे नाहक हा तरुण भरडला गेल्याचे त्याचे म्हणणे आहे. याबाबत संबंधितांविरुद्ध तक्रार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
योगेश हळदवणेकर यांच्या नावावर स्थापन झालेल्या या दोन कंपन्यांमध्ये १७८ कोटींचे व्यवहार झाले आहेत. प्राप्तिकर विभागाने हळदवणेकर यांना ३१ मार्च २०२५ पर्यंत या व्यवहारांचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हळदवणेकर यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा केला आहे.



