गावोगावी आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवा – सभापती प्रवीण पांचाळ
माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेत आवाहन

रत्नागिरी – ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान गावोगावी प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ यांनी केले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात आयोजित अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, नियमित आरोग्य तपासणीला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आजारांचे वेळीच निदान, नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे सभापती नंदकुमार मुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, गटविकास अधिकारी चेतन शेळके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, वैभव पाटील, महेंद्र झापडेकर, हर्षदा गावडे, श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्य कांचन नागवेकर, पूर्वा दुर्गवळी, साक्षी कुमठेकर, स्वाती शिंदे, दादा दळी आणि स्वप्नील मयेकर यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावोगावी आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना आरोग्यसेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्व या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



